मुंबई: धोकादायक असलेल्या एसटी मुख्यालय इमारतीची देखभाल रखडल्याने एका एसटी कर्मचाऱ्याला शुक्रवारी जीव गमवावा लागला. मुंबई सेंट्रल येथील एसटी महामंडळाच्या या इमारतीच्या लिफ्टमध्ये झालेल्या अपघातात रामानंद कृष्णा पाटकर यांचा मृत्यू झाला. पाटकर यांचा कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्याने त्यांना भरपाई मिळणार की नाही, याबाबत महामंडळाने कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे. एसटी महामंडळात वीजतंत्री (इलेक्ट्रिशिअन) पदावर रामानंद पाटकर कार्यरत होते. महामंडळात २५ वर्षाहून अधिक सेवा पूर्ण करण्यात आल्यामुळे लवकरचते निवृत्त होणार होते. शुक्रवारी इमारतीतील सर्वसामान्यांसाठी असलेली लिफ्ट बंद पडली. मुख्यालयात राज्यभरातील कर्मचारी, प्रवासी यांचा राबता असल्याने रामानंद पाटकर यांना लिफ्ट दुरुस्त करण्यासाठी पाचारण करण्यात आले. यावेळी लिफ्ट अचानक सुरू झाल्याने पाटकर लिफ्टमध्ये अडकले, असे एसटी अधिकाऱ्यांनी सांगितले.
लिफ्ट अचानक सुरु झाल्याने एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू